Thursday, 14 August 2014

About Lord Ganesha

॥ हरि: ॐ ॥

ॐ गं गणपतये नम:|

भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथिपासून भाविक वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करतात. दीड दिवस ते दहा दिवसांपर्यंत (अनंत चतुर्दशीपर्यंत) हा उत्सव साजरा केला जातो. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या घरी हॅपी होम, खार येथे पवित्र भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने गणोशोत्सव साजरा केला जातो. 

गणपतिविषयक जिज्ञासा आणि समाधान:
 
प्रत्येक मंगलप्रसंगी आद्यपूजेचा मान असणार्‍या गणपती या दैवताबद्दल सर्वांच्याच मनात अत्यंत प्रेम आणि आदर असतो. त्याचबरोबर आपल्या या लाडक्या दैवताबद्दल जाणून घेण्यास प्रत्येक श्रद्धावान उत्सुक असतो . बापुंनी याबाबतीत केलेले  मार्गदर्शन, काही महत्त्वाचे मुद्दे आपण येथे प्रश्‍नोत्तराच्या रूपात पाहूया.
 
१) गणपती शब्दाचा अर्थ काय आहे? त्याला घनप्राण का म्हणतात? गणपतीचे गजमुख काय दर्शवते? 
‘गणां चा जो  पती म्हणजे  नाथ आहे  तो  गणपती’ असा गणपती या शब्दचा सरलार्थ आहे. गणपती हा या विश्‍वाचा घनप्राण आहे. गणपती आणि घनप्राण या संज्ञांबद्दल सांगताना बापुंनी जे मार्गदर्शन केले त्याचा सारांश पुढीलप्रमाणे  आहे - ‘मंगल मंत्र स्वरूप’ असणारा, कुठल्याही पवित्र कार्याचा आरंभ सतत उचित ठेवणारा गणपती हा विश्‍वाचा घनप्राण आहे अर्थात सर्व स्थूल घटकांचा नियंत्रक आहे. घनप्राण म्हणजे द्रव्यशक्तीच्या वापरातून त्रिविध मनुष्यदेहात व निसर्गात उत्पन्न होणारी स्थूल स्तरावरील कार्यशक्ती. इंद्रियगण, विचारगण, स्मृतिगण, जिज्ञासागण, विज्ञानगण, धर्म गण व भावगण अशा सप्तगणांचा हा अधिनायक आहे. गणपतीच्या देहाकृतीला अर्थात मंत्राकाराला ॐ काराकृती असणारे गजमुख हीच गोष्ट दर्शविते.

२) गणपतीला गणपती हे नाम कुणी दिले? गणपतीची हेरंब, ब्रह्मणस्पति, गणेश ही नावे कुणी दिली? 
गणपतीच्या पित्याने  म्हणजेच परमशिवाने  आपल्या पुत्राचे  कार्य  लक्षात घेऊन त्यास ‘गणपती’ म्हणून संबोधित केले. 
स्कंद-कार्तिकेयाने आपल्या अनुजास अर्थात धाकट्या भावास त्याच्या क्रीडेस मुक्तांगण देण्यासाठी ‘हेरंब’ म्हणून साद घातली. माता शिवगंगागौरीचे मातृत्व लक्षात घेऊन पार्वतीने त्यास ‘ब्रह्मणस्पति’ हेच नाम दिले. सर्व शिवगण मात्र त्यास ‘गणेश’ ह्या कौतुकाच्या नावानेच संबोधू लागले.

३) श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे मूलार्कगणेशाची स्थापना बापुंच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली आहे. त्याबद्द्ल माहिती : 
गणपतीच्या नामकरणाच्या वेळेस आदिमातेने ‘महिषासुरमर्दिनी’ स्वरूप धारण करून त्या गणपतीस आपल्या मधुपात्रातील मध चाखविले व त्याला ‘मूलार्क’ असे नाम देऊन त्या नामाचा स्वमुखाने जयजयकार केला. श्रद्धावानांच्या देहातील मूलाधार चक्राची स्थूल आणि सूक्ष्म अशा दोनही स्तरांवर काळजी घेणार्‍या मूलार्क गणेशाबद्दल पुढील माहिती मिळते - प्राचीन ‘श्‍वेतमांदार’ वृक्षाच्या मुळातून उत्पन्न होणारा, ब्रह्मणस्पति (सूक्ष्म स्तरावर कार्य करणारा किरातरुद्र-शिवगंगागौरीपुत्र) व गणपति (स्थूल स्तरावर कार्य  करणारा परमशिव-पार्वतीपुत्र) यांचे  एकत्रित कार्य  श्रद्धावानाला भक्तीतून पुरविणारा असा हा ‘मूलार्कगणेश’ आणि त्याच्या प्रतिमा श्रद्धावानांच्या मूलाधारचक्राची स्थूल व सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांची पूर्णपणे काळजी घेतात.

* वरील तीनही प्रश्‍नां बद्दलच्या अधिक माहितीसाठी दैनिक प्रत्यक्षमध्ये  प्रकाशित झालेल्या तुलसीपत्र या अग्रलेखमालिकेतील ९४५वा अग्रलेख पहावा.

४) घनप्राणाचे प्रकटन होण्यामागील कारण काय?


कर्मस्वातंत्र्याचा वापर करून मानव ह्या द्रव्यशक्तीचा अनुचित वापरच जास्त करीत आहे व त्यामुळे ह्या विश्‍वाचा घनप्राण मनुष्यास सहाय्यभूत होण्याऐवजी त्याच्यावर क्रोधित होऊन मनुष्याच्या कार्यशक्तीस अटकाव करू लागला आहे, ही गोष्ट अत्रिॠषि-अनसूयामातेच्या लक्षात आली. तेव्हा अनसूयेने पार्वतीस बोलावून सांगितले की ह्या सामान्य मानवांची बुद्धी त्यांच्या मनापुढे अबला ठरत आहे. अशा अनुचित आचरणामुळे मानवास त्याचा अभ्युदय करून घेणे व परमात्मप्राप्ती करून घेणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे आता तू तुझ्यापासूनच उत्पन्न होणार्‍या ह्या घनप्राणास पुत्ररूपाने धारण कर व त्यानंतर त्याचे उपनयन करण्यासाठी त्याला इथे (अत्रि-अनसूया यांच्या आश्रमात) घेऊन ये.  तेव्हा तुझ्या त्या पुत्रास मी त्याच्या कार्याची दीक्षा देईन की ज्यामुळे विश्‍वचक्राच्या सर्वश्रेष्ठ उत्पत्तीची अर्थात मानवाची विकासाची गती हा तुझा पुत्र अवकुंठित होऊ देणार नाही. अनसूयेच्या आज्ञेनुसार पार्वतीने कैलासावर लगोलग जाऊन विश्‍वाच्या घनप्राणास आपला पुत्र म्हणून साकार केले. अशा प्रकारे गणपतीचा जन्म झाला. 

५) भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथिपासून गणेशोत्सव का साजरा केला जातो? गणपतीच्या चार हातांतील चार आयुधे कशाचे प्रतीक आहेत? परमात्म्याच्या कुठल्याही रूपाच्या पूजनाच्या आरंभी श्रीगणपतिचे पूजन का केले जाते?
 
उत्तर: मातृवात्सल्यविन्दानम् या ग्रंथात बापुंनी या दिवसाचे महत्त्व विशद करणारी कथा सांगितली आहे. आदिमाता अनसूयेने भरवलेला एक मोदक खाण्याने बालगणपतीची जी तृप्ती होते , त्या तृप्तीने  त्याच्या पित्याची म्हणजेच परमशिवाची २१ पट तृप्ती हो ते  हे  त्या कथेत सांगितले आहे. 

गणपतीला आवडणारा मोदक म्हणजेच लाभेवीण प्रेमाचे म्हणजेच निख्खळ आनंदाचे अन्नमय अर्थात घनस्वरूप. हा बालगणपती विश्वाचा घनप्राण आहे व म्हणूनच ह्या घनप्राणास घन अर्थात स्थूलरूपातील हा निर्भेळ आनंद मोदकरूपाने भरविताक्षणीच तो तृप्त झाला व जे जे म्हणून स्वार्थोत्पन्न अर्थात षड्रिपु-उत्पन्न, ते ते जाळण्याचे ज्याचे कार्य आहे, त्या परमशिवाची तृप्तीही केवळ घनप्राणाने एक मोदक खाण्याने झाली व तीही २१ पट, हे त्या कथेत सांगितले आहे.  ही घटना घडली तो दिवस होता, भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा!  दुसर्‍या दिवशी बालगणपतिचा उपनयन विधि होता. 
अत्रि ऋषिंनी स्वतः पौरोहित्य करून आपल्या नातवाचे उपनयन संपन्न केले . त्यानंतर मंगलविधिचा एक भाग म्हणून बालगणेश अनसूयेकडे  बटुरूपात ‘ॐ भवती भिक्षां देहि’ असे म्हणून भिक्षा मागतो. तेव्हा ही अनसूया त्याच्या झोळीत एकवीस मोदकांचे,त्याच्या चार हातांत मोदक, पाश, परशु व दन्त ह्या चार साधनांचे, त्याच्या मनात सुखकर्ता ब्रीदाचे व बुद्धीत विघ्नहर्ता तत्त्वाचे दान करते. 
  • मोदक मानवाच्या मूलाधार चक्राच्या चार पाकळ्यांमधील ‘आहार’ ह्या पाकळीवरील अर्थात कार्यभागावरील गणपतिच्या प्रभावाचे प्रतीक आहे,
  • पाश हा मानवाच्या मूलाधार चक्राच्या चार पाकळ्यांमधील ‘आचार’ ह्या पाकळीवरील अर्थात कार्यभागावरील गणपतिच्या प्रभावाचे प्रतीक आहे, 
  • परशु हा मानवाच्या मूलाधार चक्राच्या चार पाकळ्यांमधील ‘विचार’ ह्या पाकळीवरील अर्थात कार्यभागावरील गणपतिच्या प्रभावाचे प्रतीक आहे, 
  • दन्त हा मानवाच्या मूलाधार चक्राच्या चार पाकळ्यांमधील ‘विहार’ ह्या पाकळीवरील अर्थात कार्यभागावरील गणपतिच्या प्रभावाचे प्रतीक आहे व हे प्रभाव श्रीगणपतिकडे ह्या आदिमाता अनसूयास्वरूप चण्डिकेकडून आलेले आहेत. 


अशा रितीने गणपति साधनांनी युक्त व मन-बुद्धीने कार्यासाठी सिद्ध होताच अनसूयेने त्यास त्याच्या ‘विघ्नहर्ता’ व ‘मंगलमूर्ति’ कार्यास आरंभ करण्याची आज्ञा केली.  हा दिवस भाद्रपद शुद्ध पंचमी होता. 

भाद्रपद शुद्ध चतुर्थी व पंचमीस घडलेल्या ह्या महन्मंगल घटनांमुळेच सर्व ऋषिंनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून गणपतिपूजन व गणेशोत्सवास सुरुवात केली, गणपतिला २१ मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जाऊ लागला, गणपतिला एक पट दिल्याने परमशिव २१ पट तृप्त होतो, हे पाहून परमात्म्याच्या कुठल्याही रूपाच्या पूजनाच्या आरंभी श्रीगणपतिचे पूजन सुरू झाले व भाद्रपद शुद्ध पंचमीच्या दिवशी साक्षात गणपतिचे उपनयन झालेले असल्यामुळे त्या दिवसास ‘प्रज्ञानयन’ पंचमी म्हणून व ऋषि हे समाजाचे ‘प्रज्ञानयन’ असल्यामुळे ‘ऋषिपंचमी’ म्हणून ओळखले जाऊ लागले.  आदिमाता अनसूयेच्या ह्या अद्भुत लीलेमुळे विश्‍वाचा घनप्राण असणारा हा विनायक आता ‘श्रीसिद्धिविनायक’ बनून सर्व श्रद्धावान-विश्‍वाचा विघ्नहर्ता झाला.’’

* अधिक माहितीसाठी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी लिहिलेला मातृवात्सल्यविन्दानम् हा ग्रन्थ पहावा.
 

॥ हरि: ॐ||

0 comments:

Post a Comment

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys